Wednesday, July 31, 2019

चित्रकार गोपाळ देऊसकर


चित्रकार गोपाळ देऊसकर


फोटो सौजन्य: गुगल


या ब्लॉगचेस्वरूप बघता हे कलासमक्षेचे नाही किंवा यात अंतर्भूत असणार्‍या कलावंतांचे निव्वळ चरित्र सांगणारे नाही. सदर ब्लॉग महाराष्ट्रातील ज्या चित्रकाराबद्दल सांगावेसे वाटते अशा व्यक्तिचित्रकाराचे हे लिखाण आहे.
“चित्रकार गोपाळ देऊसकर” या ब्लॉग मध्ये व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकर यांचे चरित्र, वैशिष्ट यांचे प्रतिबिंब कथानकातून उलगडत जात. चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या विषयी लिहिताना या प्रबंधात यांच्या बद्दल कथा, आख्यायिका, आठवणी, दंतकथा, अशा अनेक गोष्टींचा वापर करून लिखाणाचा प्रयत्न केला आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट पेंटर म्हणून गोपाळ देऊसकर यांची जगभरात ओळख आहे. देऊसकरांनी मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट इथून जी. डी. आर्ट ही पदविका घेतल्यानंतर, इंग्लंडच्या रॉयल अकादमी येथेही चित्रकलेचे शिक्षण घेतले. रॉयल अकादमीच्या वासंतिक प्रदर्शनात सतत पाच वर्ष त्याच्या चित्रांची निवड झाली आहे. जगभरातील विविध कलासंग्रहांचा त्यांनी अभ्यास केला होता. जयपूर, बडोदा, पालनपूर, कूचबिहार यासारख्या संस्थानात राजचित्रकार म्हणून राज्यांची आणि राण्यांची व्यक्तिचित्रे त्यांनी केली. आपल्याकडे पेस्तनजी बोमनजी यांच्यापासून व्यक्तिचित्रे करणाऱ्या चित्रकारांची जी परंपरा आहे, त्यात गोपाळ देऊसकरांना एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सर्वसामान्यांना देऊसकर परिचित आहेत ते ‘टिळक स्मारक मंदिर’ आणि ‘बालगंधर्व रंगमंदिरा’तील अनुक्रमे लोकमान्-य टिळक आणि बालगंधर्वांच्या व्यक्तिदर्शनात्मक चित्रांमुळे. चित्रकलेच्या क्षेत्रात त्यांच्या कामाइतक्याच त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या वदंता प्रसिद्ध आहेत.
गोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडनमधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बाँबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
देऊसकर कुटुंब हे मूळचे देवास,मध्यप्रदेश येथील होते, पण नंतर अहमदनगर येथे स्थायिक झाले.तीन पिढ्यांपासून देऊसकर यांच्या घरात कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते.मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते. हैदराबाद येथील सालारजंग वस्तू संग्रहालयाच्या उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्वाचे योगदान होते.म्युझियमचे ते पहिले क्युरेटर होते.
गोपाळ देऊसकर हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. ते आणि त्यांची मोठी बहिण शांता हिचा १९२१ पर्यंत नातेवाइकांनी सांभाळ केला.नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देउसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. १९२७ साली त्यांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.सुरुवातीस ते खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटकमंडळीच्या बिऱ्हाडात राहिले.
चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या 'टिळक स्मारक मंदिरा'तील लोकमान्य टिळक जीवनदर्शन आणि 'बालगंधर्व रंगमंदिरा'तील बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने ल्यालेली राणी उमटली, तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही! अशी त्यांची कित्येक चित्रे! ही कहाणी आहे देऊसकरांच्या व्यक्तिगत जीवनाची.

····

आठवणी

आठवणी






आठवणी येत नाही, त्या हळूवार उतरतात आत शांत पडलेल्या हृदयाच्या काठावर.
साठवत जावं त्यांना मन आणि अंतरंगात.
रमू द्यावं, मनसोक्त हिंडु द्यावं त्यांना..
सूर्यास्तानंतर शांत बघत बसावं समोरच्या शांत आसमंताकडे..
हळुवार येणाऱ्या वाऱ्यासोबत एकटंच बोलत बसावं..

एकांताची व्याख्या माहीत आहे का?
तिथं भेटी होतात दुरावलेल्या नात्यांच्या,
बांध फुटतो विस्कटलेल्या मनातील भावनांना..!


Tuesday, July 30, 2019

आई

आई


आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं. आई म्हणजे त्यागाची भावना, नात्यांचा ताजेपणा, मनातील
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.
आजही दिवसभरात मन उदास झालं की आईची आठवण होते. आजही दु:ख झालं की वाटतं एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत जाऊन आईला बिलगावं, खूप रडावं.
सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.
मा‍झ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर मा‍झ्या सोबत उभी राहते ती माझी आई.
मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार.. आई बद्दल लिहावं एवढा मोठा मी नाहीय. तिने माझ्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी काय केलं हे शब्दात मांडणे कठीण...
आईची ती मायाजगात कुठं शोधून मिळणारी नाही
तिच्या ममतेची छाया आई विना काही नाही
आई आहे सर्व काही करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी.......
आभाळभर पसरत असते माय
सागरभर विस्तारत असते माय
धर्म, पंथ, प्रदेश नि जाती संपवत
लेकरासाठी उभी ठाकत असते माय!!

https://www.facebook.com/photo.php?fbid=1518740308211413&set=pb.100002263746401.-2207520000.1564583539.&type=3&theater

Monday, July 29, 2019

तथागत भगवान गौतम बुध्द

तथागत भगवान गौतम बुध्द



शाक्यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.
राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्‌गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्यकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्चितच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. ''
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्खू तथा भिक्खू संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.
विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय, महाकारूणीक, तथागत भगवान गौतम बुद्धास ञिवार वंदन

मला पाऊस खूप आवडायचा..



मला पाऊस खूप आवडायचा..


मला पाऊस खूप आवडायचा
मला ती पण खूप आवडायची
पावसात समोरून येणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा..

एका हाताने छत्री सावरत
एका हाताने ओढणी आवरत
अशी सावरत-आवरत चालणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा..

चिखलातून हळुवार पाय टेकवत
पैंजनाचा आवाज करत,
कडेकडेने चालणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा

पावसाच्या सरी हातावर झेलत
चोरून बघून, हळूच लाजत
नजरा नजर होताच पळत जाणारी ती,
खूप छान दिसायची
म्हणून मला पाऊस खूप आवडायचा

आता पाऊस नाहीय
पैंजनाचा आवाज येत नाही
चोरून बघणारी ती पण नाहीय,
आवडणारी ती पण नाहीय
म्हणून हल्ली मला पाऊस आवडतच नाही..

भावेश रतिलाल सोनार

माझी आजी

माझी आजी



"आजी" ची एक युनिव्हरसल डेफिनेशन आहे...
आई-बाबांकडून ओरडा खाल्यावर किंवा खायच्या आधी जाण्याची सेफेस्ट जागा म्हणजे "आजी"

"मिले सूर मेरा तुम्हारा" तल्लीन होऊन ऐकणारी आजी...

आजी म्हटले की आठवते ते कधी ना संपाव असा वाटणारे तेल मालिश...

मुळात ‘आजी’ हे रसायनच वेगळे असते. बालपणी आपल्याला आजी गोड गोड गोष्टी सांगणारी आजी, गाणे गात व पाठ थोपटीत झोपवणारी आजी, कुठे दुखले – खुपले तर हळदीचा लेप लावणारी आजी, कुणी आमच्यावर रागावले तर आमची बाजू घेऊन भांडणारी आजी, परीक्षेत पास झाल्यावर कौतुक करीत रुपया हातावर ठेवणारी आजी, आजारपणात जागरण करीत उशाशी बसून राहणारी आजी ! आजीची किती रूपे आठवावीत ? प्रत्येकाची आजी अशी असतेच ; पण माझी आजी वेगळीच होती. बाकी आज्या करतात ते ती करायची, शिवाय तिच्यात आणखी वेगळेपण होते.
माझी आजी म्हणजे आईची आई ! आजीचं नाव आशा आहे. प्रेमळ, जीवला जीवलावणारी. माझी आजी माझ्यासाठी खरंच मोठी आहे. बालपणी मी तिच्याकडच शिकलो. म्हणून मला तिची सोबत जरा जास्तच मिळालीय. माझा शाळेचा ड्रेस धून, सकाळी उठून डब्बा बनवणं, अभ्यास घेणं हे सगळं तिचं बघायची. मावशी हि होतीच.. जेवण करून घेरे - जेवण करून घेरे हे मी जेवण करत नाही तोवर बोलायची. आजीला शिक्षणाचे खूप वेड होते. पैशांचे बळ नसले तरी महत्वाकांक्षा अफाट ! चांगलं शिक म्हणजे मोठा होशील. आमच्या सारखे असं काम नाही करावे लागणार. चांगला शिकला म्हणजे चांगली नोकारी लागेल. चांगले पैसे कमावशील. चांगलं रहायचं चांगलं वागायचं असं सतत सांगत असते. अजूनही सांगते. लहानपणा पासून तिच्या कड असल्याने तिची संगत मला लाभली तिनेच काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. नाती-गोती सांभाळणं, नाती जपणं हे तिच्याकडून शिकावं, परिस्थिती नसतानाही तिने काधी कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली. ज्या गोष्टी मला कळत नाही त्या गोष्टी मला न रागवता सांगते. मला माझ्या आजी कडून कोणताच त्रास नाही. तिला माहित आहे. की मला कोणते पदार्थ आवडतात ती मला आवडीने काही ना काही बनवून देते. आजी अप्रतिम बेसनाचे लाडू बनवते ज्यांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आजी बद्दल किती लिहु आणि किती नको...
आणि काही गोष्टी लिहीण्या पेक्षा. मनाच्या कोपर्यात सांभाळून ठेवलेल्या बर्या. लहान लहान अनुभव. काही गुपित.... हा प्रत्येकाचा खजिना असतो.... प्रत्येक छोटी आठवण ही आयुष्याच्या घाई-गर्दी मधे येणारी एक गार वार्याची झुळुक असते..
पण आजी म्हटले की वाटत सगळ काही सोडून द्याव.. आणि आजी च्या मांडीत डोक ठेवून झोपाव.... परत एकदा लहान ह्याव... परत एकदा आजी म्हणत असलेल्या चिऊ काऊंच्या गाण्यात हरवून जाव....
आणि कधी झोप लागली ते कळूही नये...

बापच आहे विठ्ठल!



खाली फुकट करायचो हट्ट
बालपणी मलाच नव्हती अक्कल
बापाने पुरवले सगळे हट्ट
कदाचीत तोच आहे विठ्ठल,

आयुष्यभर चालत आली माग
ही जिंदगीची कसोटी
मी का पुजावे उगाच 33 कोटी 
जर माझा बापच आहे विठ्ठल!

-भावेश रतिलाल सोनार

पावसाचा साज



तुझ्यासाठी मी पावसाचा साज आणलाय !

एक एक थेंबाची मोहनमाळ बनवलीय,
टपोऱ्या पेंगोळ्यांचे झुमके आणलेयत.
मंद धुक्यातील हिरवळीचे काकन आणलेयत,
टपटप नाऱ्या मोत्यांचे पैंजण सुद्धा आणलंय.

भरून आलेल्या आभाळाची काजळ रेषा तुझ्या पापणीवर,
तुफान वादळाचा नाद घुमूदे पदरभर.
मला आवडतो म्हणून मातीच्या सुगंधाचे अत्तर लावून बघ,
गोजिरवाण श्रावण फुल तुझ्या लांब केसात मळून घे.
नखशिखांत पावसालाही तुझ्या सौंदर्याचा मोह होतोय!
तुझ्यासाठी मी पावसाचा साज आणलाय!

-भावेश सोनार

ती


"ती"



तस मी आणि ती भेटलो की रोजच खूप गप्पा होतात.
मनातील अगदी मोकळेपणाने सगळं मी तिला सांगत असतो..
आणि ती ही सगळं काही ऐकून घेते, समजून घेते,
ती सतत माझ्या विचारात असते..
आणि मी स्वप्नात..

पण ही विचारातील भेट मात्र वेगळीच आहे
इथं ही जग आहे, नवीन विचार आहे, आवडी निवडी आहेत, रुसवे फुगवे आहेत
चहा आहे, कॉफी आहे, 
अगदी प्रेम आणि स्वप्न सुद्धा.. 

प्रतक्ष मात्र तिचं आणि माझं भेटणं अवघड असतं
आणि ते कधीच शक्य नाही असं वाटतं..
ती खऱ्या आयुष्यात कशातच नाही..
पण विचारात तिच्या शिवाय दुसरं कुणी नाही..

मी या सगळ्यात जरी असलो तरी विचारांत ती ही माझ्या सोबत असते नेहमी,
आणि प्रत्यक्ष शक्य नसलं तरी आमची ही विचारांची भेट खरंच खूप सुंदर आहे..

- भावेश सोनार